लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : खून, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, अत्याचार आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांचा हातखंडा आहे. मात्र, डिजिटल युगात हायटेक पद्धतीने घडणारे सायबर क्राइम पोलिसांसाठी आव्हान ठरत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सायबर क्राइमसंदर्भात तब्बल १,९२८ तक्रारी व २३ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण तब्बल आठ पटींनी वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगणे, तक्रारीसाठी कस्टमर केअरला फोन करणे, इंटरनेटवरील साइटवर जॉब सर्च करणे, ऑनलाइन वाहन खरेदी या माध्यमांतून ग्राहकांची सर्वाधिक आर्थिक फसवणूक झाली आहे. ई-मेल, व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाइन बँकिंग आणि इतर व्यवहारांसाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या उपभोक्त्यांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. स्वस्तात वाहन गिफ्ट, तात्काळ कर्ज, लॉटरी, पैशांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून, तर कधी प्रेमाच्या मोहात पाडून सायबर गुन्हेगारांनी गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे ऑनलाइन पद्धतीने करोडे रुपये लुटले आहेत. सायबर गुन्हेगार देशात कुठेतरी बसून अशा स्वरूपाचे गुन्हे करतात. त्यामुळे भौगोलिक मर्यादा आणि तांत्रिक अडचणींमुळे तपासाला मर्यादा पडतात. त्यामुळे इतर गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
चार वर्षांत दाखल तक्रारी
२०१७- २५०
२०१८- ५५३
२०१९- ८८५
२०२०- १,९२८
.......................
१,३०० तक्रारींचा तपास पूर्ण
१२ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत येथील सायबर पोलीस ठाण्यात १,९२८ तक्रारी दाखल झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, पोलीस नाईक उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल गुंडू, अभिजित अरकल यांच्यासह सर्व टीमने १,३०० तक्रारींचा तपास पूर्ण केला, तर सध्या ६२८ तक्रारी प्रलंबित आहेत.
....................
केवळ ११ गुन्ह्यांची उकल
येथील सायबर पोलीस ठाण्यात २०१७ ते २०२० या कालावधित एकूण २४ गुन्हे दाखल झाले. यातील ११ गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे, तर १५ गुन्हे प्रलंबित आहेत.
...............
परप्रांतीय टोळ्यांचे कृत्य
ऑनलाइनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणारे गुन्हेगार हे परप्रांतीय आहेत. दिल्ली, नोएडा, झारखंड, मध्यप्रदेश आदी ठिकाणी या सायबर टोळ्या कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या टोळीतील सदस्य हे उच्चशिक्षित आणि आधुनिकत तंत्रज्ञानाची माहिती असणारे आहेत.
................
...अशी घ्यावी काळजी
ऑनलाइन व्यवहार करताना आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरताना नागरिकांनी दक्षता घेतली, तर या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. नागरिकांनी ऑनलाइनवर येणाऱ्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, आपली वैयक्तिक अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.