अहमदनगर: ॲप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्याने ६२ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) घडली. रोहन रमाकांत जाधव ( रा. गायकवाड कॉलनी, अभिनव कॉर्नर ) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. रोहन जाधव यांना शनिवारी यांना फोन आला. बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलतो आहे. तुम्ही तुमचे क्रिडिटकार्ड वापरत नाहीत. त्यामुळे तुम्हाला दरमहा ३ हजार रुपये चार्जेस लागतात. तुम्हाला जर क्रिडिटकार्ड वापरायचे नसेल तर मला कार्डबाबत माहिती सांगा, असे तो म्हणाला. त्यामुळे डॉक्टरांनी क्रिडिटकार्डवरील १६ अंकी नंबर पाठविला.तसेच कार्डच्या पाठीमागील तीन अंकी नबरही दिला. त्यानंतर सायबर चोरट्याने डॉक्टरांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. डॉक्टरांनी हे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सायबर चोरट्याने डॉक्टरांना एक नंबर डायल करण्यास सांगितले. सदर नंबर ॲपवर डाऊनलोड केल्यानंतर खात्यातून ५० हजार रुपये डिबीट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर दुसरा मेसेज ३१२ रुपये वजा झाल्याचा दुसरा मेसज आला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.