विनायक चव्हाण ।
मिरजगाव : भोसे खिंडीतून सीना धरणात शुक्रवारी सुटलेले कुकडीचे आवर्तन शनिवारी अवघ्या काही तासातच बंद झाले. या आवर्तनातून ५० ऐवजी फक्त ३८ दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी मिळाले आहे. यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांची शेतीसाठी कुकडीच्या पाण्याची उपेक्षा कायमच राहिली आहे.
राज्य शासनाने शंभर कोटीच्यावर रुपये खर्च करून भोसे खिंड बोगदा तयार केला. सीना धरणाला कुकडीचे हक्काचे पाणी यावे यासाठी भोसे खिंड बोगद्याची निर्मिती झाली. परंतु गेली तीस वर्षात कधीच सीना धरणाला कुकडीचे नियमित आवर्तन मिळाले नाही. सीना धरणातून कुकडीचे पाणी मिळेल या अपेक्षेवर बसलेला शेतकरी देशोधडीला लागला आहे.
कुकडीच्या व सीना धरणाच्या पाण्यावर या मतदारसंघाचे राजकारण फिरत असते. विधानसभा निवडणुकीत सीना धरणातून मागणी करूनही आवर्तन न मिळाल्याने सीना पट्ट्यात माजी मंत्री राम शिंदे यांना मतदान झाले नाही.
याठिकाणी आमदार रोहित पवार यांना मोठे मताधिक्य मिळाले. रोहित पवार यांच्या विजयानंतर या भागातील शेतक-यांना कुकडीचे नियमित आवर्तन मिळेल अशी मोठी अपेक्षा होती. परंतु या भागातील शेतकºयांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
सध्या सीना धरणात पाणी साठा फक्त मृतसाठाच शिल्लक आहे. २० जून रोजी सुटलेले कुकडीचे आवर्तन दुसºया दिवशीच बंद झाले. या एक दिवसाच्या आवर्तनातून ३८ दशलक्ष घनफूट पाणी आले.
२०१९-२० मध्ये भोसे खिंडीतून सीना धरणासाठी कुकडीचे ६४९.४ दशलक्ष घनफूट पाणी मिळेल. यातून २५८ दशलक्ष घनफूट पाणी मेहकरी प्रकल्पासाठी दिले गेले, असे सीना धरणाचे उपविभागीय अभियंता बाजीराव थोरात यांनी सांगितले.