काश्मीर ते कन्याकुमारी अंतर केले पार
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी करणाऱ्या जामखेड येथील दोन सायकलस्वारांनी दहा राज्यांतून प्रवास करत ३ हजार ८०० किलोमीटरचे अंतर अवघ्या १७ दिवसात पार केले. जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे अशी या दोन सायकलस्वारांची नावे आहेत.
पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ३ हजार ८०० किलोमीटर प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशाच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करण्याचा मानस सानप व भोरे यांनी केला होता. १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता जामखेड शहरातील एच. यु. गुगळे पतसंस्थेचे संचालक रमेश गुगळे, दिलीप गुगळे, विठ्ठलराव राऊत यांच्या उपस्थितीत सानप व भोरे यांना निरोप देण्यात आला. ते दोघे सायकलसह एका चारचाकी वाहनातून काश्मीरला गेले व तेथून १८ मार्चला सायकल प्रवासाला निघाले ते ३ एप्रिल रोजी कन्याकुमारीला पोहोचले. अवघ्या १७ दिवसात यशस्वी प्रवास निर्धारित वेळेपेक्षा तीन दिवस अगोदरच त्यांनी पूर्ण केला.
सतरा दिवसांच्या या प्रवासात दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी अशा विभिन्न नैसर्गिक आपत्तीचा त्यांना सामना करावा लागला. तरीही रोज २५० किलोमीटरचे अंतर कापत काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८०० किलोमीटरचे अंतर पार केले. सायकलस्वार डॉ. सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवरुन ते जात असतात. आता त्यांनी पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश दिला आहे.
........................
आम्ही ऐतिहासिक काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. १८ मार्च रोजी श्रीनगरच्या लाल चौक येथून आमचा सुरु झालेला सायकल प्रवास ३ एप्रिल रोजी कन्याकुमारी येथे सकाळी ६ वाजता पूर्ण झाला. हा प्रवास १० राज्यांतून केला, एकूण ३,८०० किलोमीटरचा हा प्रवास आहे. यासाठी १७ दिवस लागले.
- डॉ. पांडुरंग सानप, सायकलस्वार, जामखेड