आॅनलाईन लोकमतजामखेड (अहमदनगर), दि़ ७- नगराध्यक्षपदाच्या अविश्वास ठरावामध्ये हस्तक्षेप का करतो, म्हणून तलवार डोक्यात मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी चार नगरसेवकांसह इतर सहा जणांविरुध्द दरोडा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. नगराध्यक्ष अविश्वास ठरावावरून आता परस्परविरोधी दरोडा, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे दाखल झाल्यामुळे जामखेड नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव प्रकरणात सहभागी सत्ताधारी गटातील नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर २९ मार्च रोजी रात्री नऊ वाजता प्रशांत राळेभात यांच्यासह नगराध्यक्षांचे पती विकास राळेभात व इतर पाच जणांनी खुनी हल्ला केला, म्हणून दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी प्रशांत राळेभात यांनाही मार लागल्याने ते नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. प्रशांत राळेभात यांनी ३१ मार्च रोजी तोफखाना (अहमदनगर) पोलिसांना जबाब दिला होता. जबाबामध्ये त्यांनी म्हटले आहे, २९ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास शहरातील मेन पेठेतील काथवटे फोटो स्टुडिओ समोरून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी सोमनाथ राळेभात याने डोक्यावर रिव्हॉल्वर लावून ‘तू नगराध्यक्ष पदाच्या अविश्वास ठरावामध्ये हस्तक्षेप का करतो, तू जर पुन्हा भाग घेतला तर काटा काढीन’ अशी धमकी दिली. आरोपी नंबर एक गणेश आजबे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात तलवार मारली. व इतर आरोपी सचिन आजबे, दिगंबर आजबे, दिगंबर आजबे यांचे जावई नाव माहीत नाही, नितीन आजबे, नगरसेवक शामीर सय्यद, अमित चिंतामणी, गटनेता महेश निमोणकर, तुषार पाटील (सर्व रा. जामखेड) यांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व पॅन्टच्या खिशातून ४४ हजार रुपये काढून घेतले. तोफखाना पोलिसांनी हा जबाब नोंदवून जामखेड पोलिसांकडे पाठविला. चार एप्रिल रोजी जबाब मिळूनही गुन्हा दाखल न झाल्याने गुरुवारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, नगरसेवक डिगांबर चव्हाण, पवन राळेभात, हनुमंत पाटील, भगवान गिते यांच्यासह ६० ते ७० जणांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन दोन दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जामखेड पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला.
जामखेड येथे चार नगरसेवकांसह दहा जणांवर दरोड्याचा गुन्हा
By admin | Published: April 07, 2017 4:58 PM