अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९ मे) एकाच दिवशी तब्बल नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या ११२ झाली आहे.
यामध्ये घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला १, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथे आलेला १, संगमनेर येथील २, तर निमगाव (राहाता) येथील ४ जणांचा समावेश आहे. बाधीत रुग्णामध्ये ४ पुरुष, ४ महिला आणि ४ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे.
राहाता तालुक्यातील निमगाव येथे शुक्रवारी जे चौघे पॉझिटिव्ह आढळले. त्या व्यक्ती तेथीलच यापूर्वीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे.
संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने संगमनेर ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. तर दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने पाठवले होते. जिल्हा रुग्णालयात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपकार्तील आहे. चाकण येथून शेवगाव तालुक्यातून ढोरजळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवकही बाधित आढळला आहे.