श्रीगोंदा : कुकडीच्या पाणी प्रश्नी पुणेकरांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे नगरला हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी आपले साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचे दोन साखर कारखाने जोरात चालले आहेत, असा आरोप माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे यांचे नाव न घेता केला.
आमदार पाचपुते यांनी सोमवारी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण कुकडीच्या पाणी प्रश्नी एक दिवसीय उपोषण केले. यावेळी पाचपुते बोलत होते. दरम्यान, तहसीलदार महेंद्र माळी यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाचपुते यांनी उपोषण सोडले
कुकडीचे शेतीसाठी तीन आवर्तने मिळतील अशी परिस्थिती होती. मात्र पुणेकरांनी सहा टीएमसी पाण्यावर डल्ला मारला. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपल्यावर कुकडीच्या आवर्तनाचे नियोजन करण्यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र दिले. डिंबेचे येडगावमध्ये ७५० तर तर माणिकडोहमधून ५०० एमसीएफटी पाणी घ्यावे. त्यानंतर दि २५ मे पासून आवर्तन सुरू करा. नंतर पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील अडीच टीएमसी घ्या. शेतीचे आवर्तन पूर्ण होईल, असे सांगितले. पण जलसंपदामंत्र्यांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र पुणेकरांचे बंधारे भरण्यासाठी मदत केली, असा आरोपही पाचपुते यांनी केला.