कॅन्सर, किडनी तसेच इतर विकारांवर उपचार करण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्गाची इलेक्ट्रॉनिक, कापड, ऑटोमोबाईल, मोबाईल ॲक्सेसरीज, स्टेशनरी खरेदी मुंबईतूनच केली जाते. प्रशासकीय व मंत्रालयातील कामकाजासाठी जाणारे नोकरदार व राजकीय कार्यकर्त्यांची शिर्डी-दादर रेल्वेगाडीला विशेष पसंती असते. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रवासी संघटनेने लढा दिला. त्यास अखेर यश आले.
शिर्डीहून पुणेमार्गे चार, तर मनमाडमार्गे चार रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या दरात सेवा देतात. त्यामुळे त्या प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या आहेत. दरम्यान, कोविड संकटामध्ये नगरवरून जाणाऱ्या व पुणे येथून नागपूरकरिता सुटणाऱ्या काही रेल्वेगाड्या बंद झाल्या होत्या. यामध्ये गरीब रथचाही समावेश होता. त्याही आता पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
----
साईनगर स्थानकावरून साडेआठ वाजता दादरसाठी रेल्वेगाडी सुटते. सकाळी सहा वाजता ती दादर येथे प्रवाशांना सोडते. त्यामुळे मुंबईत दिवसभरातील कामे आटोपून माघारी फिरता येते. मुक्कामाची गरज पडत नाही व पैशांची बचत होते.
------
शिर्डी ते दादर २७० रुपये आरक्षित बोगीचे दर आहेत. मनमाडमार्गे जाणाऱ्या गाडीचे दर २५५ रुपये आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे.
---
रेल्वे प्रशासनाने दादर व नागपूर या रेल्वेगाड्या सुरू केल्याबद्दल आभारी आहोत. आता सोलापूरहून अजमेर येथे सुटणारी व नगरहून जाणारी गाडी पूर्ववत सुरू करावी. त्याचबरोबर अहमदाबादसाठी गाडीची आवश्यकता आहे.
रणजित श्रीगोड,
ज्येष्ठ नेते, प्रवासी संघटना.
-----