कोपरगाव : नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे धरणातील शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आमदार स्रेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दुष्काळ, पूर अवर्षणामुळे पिके जळतात. यातून शेतक-यांचे मोठे नुकसान होते. यासाठी शेतक-यांना शाश्वत सिंचन दिले. जलयुक्तशिवारमधून सिंचनाचे पाणी दिले. शेततळे, विहिरी दिल्या. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी पैसा दिला आहे. या कामांसाठी मंत्री विखे यांनी पाठपुरावा केला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. परंतु काहींनी शेतक-यांची दिशाभूल केली. राखीव पाण्यातून कोपरगावला पाणी दिले. शेतक-याच्या कोट्यातील पाणी दिले नाही. यासाठी आमदार कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या गेल्या १५ वर्षातील आणि भाजपच्या पाच वर्षाच्या काळातील कामांचा आलेख मांडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ५० लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली. यात कोपरगाव तालुक्यातील शेतकºयांना ३४ कोटींची कर्जमाफी मिळाली. धरणांमधील शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. निळवंडे धरणातील बंद पाईपलाईनव्दारे पाणी योजनेस मंजुरी दिली. हा ऐतिहासिक आहे. यातून कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय बसस्थानक, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस वसाहत, वाचनालय इमारतीसाठी निधी दिला. मतदारसंघातील प्रलंबित पाणी योजनांसाठी २६ कोटींचा निधी दिला. पुणतांब्याचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यासाठी १६ कोेटींचा निधी दिला. वारी पाणी योजनेला १७ कोटींचा निधी दिला. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने मुख्यमंत्र्यांनी अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावल्याचेही त्यांनी सांगितले. कोणी कितीही अमिषे दाखविली तरी त्यास मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 1:11 PM