घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.
पठार भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठेेे नुकसान झाले आहेेे. रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. त्यात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुंजाळवाडी पठार, कर्जुले पठार, सारोळे पठार, सावरगाव घुले, डोळासणे आदी गावांच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. गुंजाळवाडी पठार गावांतर्गत असलेल्या काटवनवाडी येथील प्रशांत बाळू दुधवडे यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. घरातील धान्य पावसात भिजले असून, संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते वादळात त्यांच्या याच घराचे पत्रे उडाले होते. त्यानंतर त्यांनी घरावर नवीन पत्रे टाकले होते. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने त्यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. वरुडी फाटा येथेही शंकर घुले यांचे पत्र्याचे शेड वादळाने उडून नाशिक-पुणे महामार्गावर पडले. नागरिकांच्या मदतीने ते बाजूला घेण्यात आले. कृष्णा दिवेकर यांच्या दुकानाचे पत्रे उचकटल्याने नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच गुंजाळवाडी पठार गावचे सरपंच रवींद्र भोर, माजी सरपंच संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट दिली. झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब दांपत्याचे घर कोसळले अन् क्षणातच संसार रस्त्यावर आला. सर्व नुकसानग्रस्तांना प्रशासनानेे मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.