निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात दोन दिवसांच्या अवकाळी पाऊस व वादळाने चांगलाच तडाखा दिला. याचा फटका कांदा, गहू, डाळिंब, द्राक्षे पिकांना सर्वाधिक बसला.
निघोज परिसरात सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने कांदा, गहू, डाळिंब, द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच कांदा, गहू काढणीला आला होता. त्यांचे नुकसान झाले. डाळिंब, द्राक्षे बागांचीही फळधारणा झालेली आहे. अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
गेल्या वर्षीपासून शेतकरी अगोदरच संकटात आहे. त्यातच गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती कोणतीच पिके लागली नाहीत. त्यातच कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून राज्य व केंद्र सरकारने मदत करावी. कांदा भाववाढीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न करावा, अशी मागणी निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ, सचिव रामदास वरखडे, रवींद्र रसाळ, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गुंड, उपाध्यक्ष चंद्रकांत लंके, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात आमदार नीलेश लंके व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--
कांदा भावाबाबत आपण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली आहे. ते या विषयाबाबत राज्यसभेत व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत.
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर
---
२६ निघोज
निघोज येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत लंके यांच्या शेतातील डाळिंब बागेलाही अवकाळीचा तडाखा बसला.