कोपरगाव : गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सुटून आज वीस दिवस उलटून गेले आहे. तरी देखील पाटबंधारे विभागाकडून कोपरगाव तालुक्यातील चाऱ्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने तालुक्यातील सर्व चाऱ्या सोडून पिकांबरोबरच बंधारे व गावतळे ही भरून द्यावीत, अशी मागणी शिवसेना नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औताडे म्हणाले, चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस चांगला होऊन सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहे. उन्हाळी आवर्तन वेळेत मिळायला हवे होते. मात्र, ते उशिरा मिळाले आहे. वीस दिवसांपासून गोदावरी कालव्यांना पाणी चालू आहे. इंग्रज काळापासून आवर्तन सुटल्यानंतर टेलपर्यंत चितळीला पाणी गेल्यानंतर तालुक्यातील हरिसन ब्रँच व इतर चाऱ्या पाच दिवसानंतर सुटल्या जात. त्यामुळे पूर्वी शेतीला चांगले दिवस होते. आता मात्र, धरणात पाणी असून देखील केवळ नियोजन बिघडल्यामुळे शेतीला पाणी कधी मिळेल याची शाश्वती राहिली नाही, त्यामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभी केलेली चालू वर्षाची उन्हाळी पिके ऊस, चारापिके ,फळबाग आदी पिके तीव्र उन्हामुळे आज कोमेजून गेलेली आहेत. आठ दिवसांपूर्वीच या पिकांना पाणी मिळणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. आता पाटबंधारे विभागाने कोणताही विलंब न करता ताबडतोब तालुक्यातील चाऱ्या सोडून पिकांना पाणी द्यावे. पाणी साठा भरपूर असतानाही पाणी मिळण्यास दिरंगाई होत आहे. याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार आहे.