कोपरगाव : गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.पोलिसांची माहिती अशी मोर्वीस गावचे सरपंच एकनाथ माळी व निलेश गोरख वाघ हे दोघे जण तालुक्यातील मंजुर शिवारातील गोदावरी नदी पात्रातुन विना परवाना बेकायदा वाळू उपसा करीत असताना तलाठी भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे चिडून माळी व वाघ यांनी तलाठी शिंदे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा प्रकार २१ फेब्रवारी रोजी घडला. याप्रकरणी तलाठी शिंदे यांनी दिलेल्या फियार्दीवरून तालुका पोलिसांनी सरपंच माळी व त्यांचा साथीदार वाघ अशा दोघा जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र घटनेपासून दोघेही फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशिद, चंद्रकांत तोर्वेकर व पी.व्ही. कुळधर, अशोक शिंदे, असिर सय्यद यांच्या पथकाने गुरूवारी पहाटे सव्वा चार वाजता मोर्वीस गावात सापळा लावून सरपंच माळी यांना त्यांच्या राहत्या घरातुन ताब्यात घेतले. तर वाघ यास बदापूर(ता.येवला) येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपए किमतीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाच्या ट्रॉलीसह ३ हजार ५०० रूपयांची १ ब्रास वाळू अज्ञात ठिकाणी लपवून ठेवली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.