संगमनेर : संत समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला ग्रंथ दासबोध म्हणजे जीवनाचा सखोल शोध घेणारा सर्वोत्तम संशोधनपर आणि चिंतनपर ग्रंथ आहे. म्हणूनच जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करून मांडलेले तत्त्वज्ञान ‘दासबोध’च्या माध्यमातून घराघरांत पोचविले पाहिजे. दासबोधरूपाने समर्थ रामदासस्वामींची कीर्ती अजरामर आहे, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.
दासनवमीनिमित्त येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमात जाखडी बोलत होते. व्यासपीठावर संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, बापू दाणी, अभय देशपांडे, सतीश देशपांडे, निलेश पुराणिक, विशाल जाखडी, राजू क्षीरसागर, सागर काळे उपस्थित होते. संत रामदासस्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
संत रामदासस्वामींनी मरगळ आलेल्या समाजात मोठी जागृती केली. तरुणांना बलोपासनेसाठी प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक ठिकाणी हनुमानाची देवालये उभारली. तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचंड भ्रमंती केली. सर्व ठिकाणच्या हालचाली डोळसपणे टिपल्या. परकीय आक्रमकांना थोपविण्यासाठी देव, देश आणि धर्म यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा बलशाली समाज ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने जीवनभर कार्य केले. त्यांना प्रचंड मोठा शिष्य परिवार लाभला. दासबोधरूपाने त्यांची कीर्ती अजरामर आहे, असे जाखडी म्हणाले.
यावेळी प्रा. सतीश देशपांडे यांनीही समर्थांच्या जीवनकार्यावर विचार मांडले.