सुहास पठाडे -नेवासा ( जि. अहमदनगर) - पोलीस निरीक्षकास धक्का देत पलायन केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पोलीस निरीक्षक विजय करे जखमी झाले आहे. याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप कुऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे. यात ३ डिसेंबर रोजी सरकारी गाडीतून शेवगाव पोलीस ठाण्याकडून नेवासा येथे येत असताना नेवासा फाटा-नेवासा रस्त्यावरील ज्ञानेश्वर कॉलेजजवळील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगांच्या विना नंबर पल्सर गाडीवर दोन जण बसलेले होते. मागील महिन्यात कॉलेजवर झालेल्या भांडणाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस कर्मचारी कुऱ्हाडे यांना गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरून पोलीस निरीक्षक करे हे सदर विना नंबर वाहनाबाबत व इथे का थांबलात, अशी विचारपूस करत चालकास नाव- गाव विचारले. यावर त्यांनी नाव न सांगता पोलीस निरीक्षक करे यांना जोरात धक्का देत वाहन नेवासा शहराच्या दिशेने पळविले. त्यावेळी पोलीस निरीक्षक करे हे डांबरी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.
यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी गाडी चालवत असणारा अरमान जावेद बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व त्याच्या सोबत असलेल्या अरबाज रियाज सय्यद (रा.नेवासा खुर्द) असे नावे सांगितले.त्यानंतर पोलीस निरीक्षक करे यांना उपचारासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अरमान जावेद बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व अरबाज रियाज सय्यद (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.