दरोडेखोरांची महिला-पुरुषांना मारहाण पाथर्डी: तालुक्यातील केळवंडी येथील खोजे वस्तीवर बुधवारी रात्री अज्ञात सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत वस्तीवरील महिलांना व पुरूषांना दगडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत एका महिलेचा कान तुटला तर इतर तिघे जण जखमी आहेत. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून सुमारे एक लाख तीस हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री ११ च्या सुमारास केळवंडी येथील खंडू बाळाजी खोजे यांच्या वस्तीवर दरोडेखोर आले. त्यांनी दगडाने घरातील व्यक्तींना आधी जबर मारहाण केली. या मारहाणीत खंडू खोजे यांच्या पत्नी सत्यभामा खंडू खोजे यांचा कान तुटला. सुखदेव बाळाजी खोजे, खंडू बाळाजी खोजे व रंजना रामचंद्र चेके यांना जबर मारहाण करण्यात आली. घरातील तीन तोळयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४० हजार असे एकूण एक लाख तीस हजार रूपये किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. जखमींना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हारूग्णालयात दाखल केले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. केळवंडी येथील महादेव शेटे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच अर्ध्यातासात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक वाय.डी.पाटील, पोलीस निरीक्षक उमेश हजारे व पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याबाबतची फिर्याद खंडू बाळाजी खोजे यांनी दिली असून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामीण भागात विशेषत: माणिकदौंडी भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले चौघेजण उपजिल्हा रूग्णालयात घाबरलेल्या अवस्थेत होते. यावेळी सत्यभामा खोजे म्हणाल्या, सहा जण जवळून दगड मारीत होते व इतर पाच सहा जण थोड्या अंतरावर उभे होते. काही कळायच्या आत त्यांनी दगडाने मारहाण सुरू केली. त्यामुळे आम्ही भयभीत झालो. आमची सून, तीन नातवंडे वरती झोपले होते. त्यामुळे त्यांना दगडाचे फटके बसले नाहीत. दरोडेखोरांनी वर दगड फे कले. मुलगी रंजना ओरडायला लागली तेव्हा ओरडू नको असे म्हणत दरोडेखोरांनी तिला सुध्दा मारहाण केली. घरामधील दागिने, पैसे,कागदपत्रांची बॅग त्यांनी नेली . दीराला व जाऊबाईला मारहाण केली असे त्या म्हणाल्या. (तालुका प्रतिनिधी)
दरोडेखोरांची महिला-पुरुषांना मारहाण
By admin | Published: May 15, 2014 10:42 PM