थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 21:47 IST2025-02-02T20:50:11+5:302025-02-02T21:47:12+5:30
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आयोजकांनी ठेवलेल्या बक्षिसांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सल्ला दिला आहे.

थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला
Maharashtra Kesari 2025: गेल्या पाच दिवसांपासून अहिल्यानगर येथील वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कुस्त्यांचा थरार रंगला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तिगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढतीची स्पर्धा आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित केली होती. महाराष्ट्र केसरी किताब लढतीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांवरुन अजित पवार यांनी आयोजकांना सल्ला दिला.
"अरुण काका जगताप आणि संग्राम जगताप यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यातल्या क्रीडा रसिकांनी त्याला चांगला प्रकारे साथ दिली आहे. महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेत मोठी बक्षीस दिली जाणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना थार मोटार, बुलेरो कार तसेच १८ बुलेट २० स्प्लेंडर, ३० सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीसं मला कुठे पाहायला मिळाली नव्हती. पुढच्या वेळेस जे स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी. कारण शेवटी हा पायंडा पडतो," असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केलं होतं. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संग्राम जगताप यांनी दोन वर्षांपूर्वीच ही स्पर्धा अहिल्यानगर येथे होणार होती असं म्हटलं. मात्र ती पुण्याला झाली. यंदाच्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाल्यामुळे संग्राम जगताप यांनी भवदिव्य अशा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती.