चिखलठाण(राहुरी) : वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले तहसीलदार, पोलीस व तलाठी यांच्या वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे जखमी झाले आहेत. पोलीस व तलाठ्यांनाही मार लागला आहे. हल्ल्यानंतर वाहनांसह तब्बल ३८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल वाळूतस्करांनी पळवून नेला. ही घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अल्ताफ शेख, जावेद शेख, पिरण सय्यद, अण्णा येसू काळनर, संजय डोलनर, अर्जुन पथवे, राजु मेंगाळ, प्रमोद गि-हे, उत्तम जाधव, अण्णा मध्ये यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी हल्ला केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.याबाबत चिखलठाणचे तलाठी काशिनाथ परते यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुळा नदीपात्रामध्ये राहुरी तालुका व पारनेर तालुक्याच्या दोन्ही बाजून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरु असतो. तहसीलदार अनिल दौंडे, तलाठी परते, एस.के.आडोळे, एस.एस.पाडळकर काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चिखलठाण येथील वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुळा नदीपात्रात विना क्रमांकाचे तीन जेसीबी, विना क्रमांकाचे दोन ट्रक्टर व दोन ढंपर वाळू चोरुन भरत असल्याचे निदर्शनास आले. या वाहनांवर कारवाई सुरु असताना वाहनांचे मालक, चालक व वाळू कामगारांनी तहसीलदार व पथकावर दगड गोट्यांनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्यांच्या ताब्यातील वाहनेही पळवून नेली. या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल बडे यांच्या कपाळाला मार लागला असून दोन टाके पडले आहेत. तलाठी एस.के. आडोळे व तहसीलदार यांना पाठीवर व पायावर मुक्का मार लागला आहे. पोलीसाकंडून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे.
वाळूतस्करांचा राहुरीच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला : ताब्यातील वाहनेही पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:18 AM