रोहित टेके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीत कोपरगाव नगर परिषदेने सोडलेल्या मैलामिश्रीत हानिकारक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. याच नदीच्या प्रदूषित पात्रातील पाण्यात उतरून माणसाद्वारे जीव धोक्यात घालून राजरोस वाळूचा उपसा करण्यात येत आहे. या दूषित पाण्यातून दुर्घटनादेखील होऊ शकते; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कोपरगाव शहरातील गटारीद्वारे गोदावरी नदीत मैलामिश्रीत हानिकारक रासायनिक घटक असलेले सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साठलेले असून, त्यास दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सद्यस्थितीत याच दूषित पाण्यात माणसे उतरून प्रसंगी पाण्यात डुबकी मारून पाटीपाटी वाळू काढून तिचे ढिगारे घातले जात आहेत. नंतर हीच वाळू शहरातील विविध ठिकाणी बांधकामासाठी गाढवांद्वारे वाहतूक केली जात आहे. या कामाला दररोज पहाटे सुरुवात करण्यात येते. यात अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.
ज्यावेळी हे दूषित पाणी गटारीद्वारे नदीत वाहत येते, त्यावेळी त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पूर्णतः नष्ट झालेले असते. याउलट हे पाणी साचून राहिल्यास त्यातून मिथेन नावाच्या घातक वायूची निर्मिती होते. अनेक प्रकारच्या जीवजंतूची निर्मितीदेखील होते. अशा पाण्यातून निघणारा मिथेन हा वायू निसर्गासह मनुष्याच्या जीविताला अत्यंत हानिकारक आहे. या वायूच्या जास्त संपर्कात आल्यास जीवितास धोकादेखील होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
.......
प्रशासन का करतेय दुर्लक्ष?
कोपरगाव शहरालगत होणाऱ्या या जीवघेण्या वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? हा उपसा प्रशासनाची परवानगी काढून होतो का? आणि तसे असल्यास सर्व दुष्परिणाम माहीत असतानादेखील अशा जीवघेण्या वाळू उपशाला परवानगी आहे? जर विनापरवानगी हा उपसा सुरू असेल तर प्रशासन डोळे मिटून गप्प का बसलेले आहे, असा सवाल व्यक्त होत आहे?
...............
अशा पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध वारंवार कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची गाढवं जप्त केली आहेत. यापुढेही कारवाई करण्यात येईल.
-योगश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.
...............
कोपरगाव शहरालगत नदीत संपूर्ण नदीचे सांडपाणी साचलेले आहे. ते पूर्णतः दूषित झाल्याने त्यातून मिथेन या जीवघेण्या वायुची तसेच जीवजंतूची निर्मिती होते. या पाण्यात माणूस उतरल्यानंतर त्याचा अचानक या वायूशी संपर्क आल्यास चक्कर येऊन पाण्यात पडून दुर्घटना घडू शकते. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेचे आजार जडू शकतात.
-डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव.
.................
फोटोओळी –
कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या दूषित पाण्यात उतरून माणसांद्वारे जीवघेणा वाळू उपसा केला जात आहे.