निंबळक: तरसाने चावा घेतलेल्या तरूणाचा पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.निमगाव वाघा ( ता.नगर) येथील रावसाहेब जाधव यांना १९ जूनला घराबाहेर झोपले असताना तरस या प्राण्याने चावा घेऊन जखमी केले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसानंतर त्यांची प्रकृती बिघडली. जाधव यांना रेबिज झाल्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिला. मात्र ससून रूग्णालयाने जाधव यांना दाखल करून घेण्यास नकार देत खासगी रूग्णालयास दाखल करण्यास सांगितले. जाधव हे शेतकरी कुंटुबातील अअसल्याने व त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने ग्रामस्थांनी आर्थिक मदत करीत खासगी रूग्णालयात त्यांना दाखल केले होते. तेथे उपचार घेताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यातच रावसाहेब यांचे वडील जनावरे चारण्यासाठी शेतात गेले असता याच तरसाने त्यांच्यावर हल्ला केला होता. वन कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. जाधव यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाने आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.