घारगाव : महावितरणच्या उपकेंद्रात काम करत असताना एका कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा(यंत्रचालक) शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी ( दि.२१ ) कर्जुले पठार उपकेंद्र ( ता . संगमनेर ) या ठिकाणी घडली आहे . या दुर्दैवी घटनेत सोपान भावका कुलाळ (वय २९) रा.जवळे बाळेश्वर (ता.संगमनेर) या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला . या घटनेमुळे परिसरात व वीज वितरण कंपनीच्या कर्जुले पठार कार्यालयात खळबळ उडाली आहे .
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे महावितरणचे उपकेंद्र आहे.या उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील कंत्राटी कर्मचारी(यंत्रचालक) सोपान कुलाळ हे काम करत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, महावितरणचे शाखा घारगाव येथील कनिष्ठ अभियंता आशिष अरविंद रणदिवे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल ए.आर.गांधले करत आहेत.