जामखेड : श्रीराम शुगर अँड अॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली.तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर अँड अॅग्रो प्रोडक्ट्स या साखर कारखान्यात १२ नोव्हेंबर २०१७ पासून उत्पादन विभागात हेल्पर म्हणून नोकरीस असलेला विनोद अंकुश मोरे (वय १९, रा. गांधनवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) हा शुक्रवारी रात्रपाळीला काम करीत होता. रात्री दीडच्या सुमारास हा कारखान्यातील ग्राऊंड फ्लोअर असलेल्या उकळत्या साखरेच्या पाकाशेजारी (सेन्ट्रीफ्युगन टब) एकटाच काम करीत होता. तर बाकीचे सहकारी वरच्या मजल्यावर दुरूस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी कामगार विनोद मोरे हा उकळत्या पाकाच्या टबमध्ये पडला. याचा आवाज वरच्या मजल्यावरील कामगारांना आल्याने त्यांनी ताबडतोब मशिनरी बंद केली व टबमध्ये गंभीर अवस्थेत जखमी पडलेल्या विनोद मोरे यास बाहेर काढले. त्याला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तोपर्यंत विनोद गतप्राण झाला होता. यावेळी कारखाना प्रशासनाने सदर साखरेचा पाक असलेला टब धुवून काढून कारखाना पुन्हा चालू केला.विनोद मोरे मृत्यू पावल्याची खबर कारखाना जनरल मॅनेजर एस़ जे़ गाढवे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब कारखान्यात काम करणारे मयत विनोद याचे मेव्हणे शिवाजी झांबरे यांना कळवले. त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. तोपर्यंत मृतदेह दवाखान्यातच होता. आज सकाळी मयत विनोदचे आई, वडील आले. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले़ त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गांधनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हळगाव येथील श्रीराम कारखान्यात उकळत्या पाकात पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:20 PM