पाथर्डी : शहरातील अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.मयत दुर्गा कोष्टी या अष्टवाडा येथील त्यांच्या घरी पती ओमकार उर्फ बाळासाहेब कोष्टी यांच्यासह राहत असून रात्री अज्ञात मारेक-यांनी दुर्गा कोष्टी यांच्या डोक्यात टणक शस्त्राने घाव घालून त्यांचा खून केला आहे. मयत दुर्गा यांच्या गळ्यावर ओरखडल्याचे निशाण असून चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे सांगण्यात येते. परंतु मयत दुर्गा कोष्टी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, कानातील सोन्याचे दागिने पायातील चेन आदी वस्तूंची चोरी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनाही कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय आहे. पोलीस पथकाने श्वानामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु श्वान घरातच घुटमळल्याने मयताच्या मृत्यूबाबत संशय गडद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, मध्यरात्री १.३८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची कोष्टी यांच्या घराजवळ संशयास्पद हालचाल सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दुर्गा यांचे पती बाळासाहेब हे पतसंस्थेत कलेक्शनचे काम करतात. दोघेही अष्टवाडा येथे राहत होते. मयत दुर्गा यांचे दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत आहेत.
पाथर्डी येथे चोरट्यांच्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:29 PM