नेवासा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ सोमवारी मध्यरात्री अॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर भाजलेल्या तिसऱ्या मुलाचाही उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.नेवासा पोलीस ठाण्यात शफिक रफिक कुरेशी (रा. संजयनगर नं-५ औरंगाबाद) यांनी खबर दिली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी यांच्या नातेवाईकांचा सोमवारी संध्याकाळी साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबिय औरंगाबादहून चांदा येथे आले होते. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा (क्र. एम.एच.२०-ईएस ०७२२) मध्ये चालक समीर हनिफ कुरेशी, रफिक हाजिजाफर कुरेशी (वय ५५), जुनेद शाफिक कुरेशी (वय १३), नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) (सर्व रा़ संजयनगर नं-५ औरंगाबाद) हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. प्रवरसंगम जवळील पेट्रोल पंपासमोर त्यांची रिक्षा आली असताना रिक्षाने पेट घेतला. त्यामध्ये नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) या दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यातील जुनेद शाफिक कुरेशी (वय १३) याची प्रकृती गंभीर होती. त्याचाही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
नातींचा मृत्यू पाहिला डोळ्यांनी
या घटनेत एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती रिक्षामधून प्रवास करीत होते. खबर देणारे शफिक रफिक कुरेशी यांचे वडिल रफिक कुरेशी, मुलगी नमिरा, मुलगा जनेद आणि पुतणी महेविश हे सर्व रिक्षामधून जात होते. तर रिक्षाचालकही त्यांचा नातेवाईक होता. रिक्षाने पेट घेतल्यानंतर आजोबांनी जखमी अवस्थेत जुनेदला वाचविले. मात्र, पेटलेल्या रिक्षात नमिरा व महेविश या दोघी नातींचा होरपळून झालेला मृत्यू पाहण्याखेरीज त्यांच्याकडेही पर्याय उरला नाही. रिक्षाने पेट घेतल्यानंतर ही रिक्षा परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान नागरिकांनी अॅम्ब्युलन्स बोलावून जखमी तिघांना रुग्णालयात हलविले.