अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे-डोंगरगाव शिवारातील आढळा नदीपूलाजवळ आज सकाळी एक बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तर मंगळवारी पाडोशी शिवारात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. दोन दिवसात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आंबरे-डोंगरगाव शिवारात आज सकाळी दीड वर्षे वयाची बिबट्याची मादी मृत अवस्थेत आढळून आली. सुभाष कारभारी नाईकवाडी यांच्या मालकीच्या शेतामध्ये ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दोन बिबट्यांच्या भांडणात मृत मादी बिबट्याच्या नरडीला खोलवर जखम झाली होती. जवळच्या वस्तीवरील शेतकºयांनी राञी बिबट्यांच्या भांडणाचा आवाज ऐकला पण भितीमुळे कुणी घराबाहेर आले नाही. ‘दीड वर्षांची ही मादी वयात असावी. संभोगाच्या दरम्यान दोन बिबट्यांच्या भांडणामधे ती जखमी होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचे वनपरिक्षेञ अधिकारी जे.डी.गोंदके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मृत बिबट्याला सुगाव रोपवाटिकेत आणल्यावर पशुवैद्यकयि अधिकारी डॉ.वाळुंज यांनी शवविच्छेदन केल्यानंतर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसरा बिबट्या मंगळवारी सकाळी आदिवासी भागातील पाडोशी शिवारात मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या दोन्ही पायाच्या पंजाची नखे व दात काढलेले होते. वनविभागाने या मृत बिबट्यास वनविभागाच्या सांगवी रोपवाटिकेत नेल्याचे पाडोशी येथील स्थानिक वनसमितीचे सदस्य लक्ष्मण भांगरे व डॉ.शरद तळपाडे यांनी सांगितले. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी दोन दिवसांपासून राजूर वनपरिक्षेञ अधिकारी दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्विकारला नाही. संगमनेर उपविभागिय वन अधिकारी मच्छिंद्र गायकर यांच्याशीही संपर्क केला असता त्यांनीही फोन स्वीकारला नाही. आदिवासी भागात संशयास्पद बिबट्यांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले असून वनविभाग माञ सूस्त दिसत आहे.