अहमदनगर : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत कक्षात बसलेल्या एका तरुणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
नीलेश चौधरी (वय ३०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मूळचा नाशिक येथील असलेला हा तरुण २०१७-१८मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात संगमनेर तालुक्यात कार्यरत होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने याच विभागांतर्गत परीक्षा दिली व त्याची नियुक्ती नाशिक जिल्हा हिवताप कार्यालयात झाली, परंतु नगर येथे कार्यरत असताना कार्यालयांतर्गत त्याचे काही प्रलंबित प्रश्न होते. त्यासंदर्भात त्याने पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेटही घेतली होती, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, बुधवारी (दि.३०) सायंकाळी हा तरुण सीईओंच्या अभ्यागत कक्षाबाहेर बसला होता. पाचच्या सुमारास त्याला बसल्याजागीच उलट्या झाल्या व तो खाली कोसळला. सीईओंच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला उचलले व रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात हलवले. परंतु दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनानंतरच कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनील पोखरणा यांनी दिली.
--------------
संबंधित तरुण बुधवारी अभ्यागत कक्षात बसला होता. परंतु त्याने आपल्याला भेटण्यासाठी चिठ्ठी किंवा काही निवेदन दिलेले नव्हते किंवा आमच्या कोणा कर्मचाऱ्याकडे भेटण्याची इच्छाही बोलून दाखवली नव्हती. तो अचानक उलट्या होऊन कोसळला. त्यामुळे त्वरित रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले. परंतु नंतर तो मृत्यू झाल्याचे समजले.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
-------------