मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (दि. २३) पगडाल यांनी निवेदन पाठविले आहे. जितके वाॅर्ड लहान तितके ते छोट्या, छोट्या समूहांना निवडून येण्यास पोषक असतात. ‘एक वाॅर्ड एक प्रतिनिधी’ या सूत्रामुळे अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलुतेदार, छोट्या कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना निवडून येण्याची अधिक संधी असते. वाॅर्ड ऐवजी प्रभाग केल्यानंतर मतदार संख्या वाढते. त्यामुळे छोट्या- छोट्या जाती समूहाचे राजकीय खच्चीकरण होते. धनदांडगे, अधिक लोकसंख्या असलेले जातीसमूह यांचे फावते. त्यामुळे मोठे प्रभाग आणि त्यातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी निवडण्याला आमचा विरोध आहे. नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडल्यामुळे छोट्या वाॅर्डातून निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील नगराध्यक्ष होण्याची संधी मिळते. आम जनतेतून नगराध्यक्ष निवडणे म्हणजे अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलुतेदार, कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना नगराध्यक्ष होण्याची संधी नाकारणे होय. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे केंद्रीकरण झाले आहे, त्यांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने आपला निर्णय बदलू नये. ‘एक वाॅर्ड एक प्रतिनिधी’ हाच निर्णय कायम ठेवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय बदलू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:25 AM