अहमदनगर : सध्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार मिळून घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शिवाय केंद्र सरकारने ईडीचा वापर राजकीय द्वेषापोटी करू नये, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये व्यक्त दिले.
शुक्रवारी मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नगरविकास आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. काँग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. महाविकास आघाडीत आता हे पद कोणाकडे राहील, शिवसेना त्यावर दावा करणार आहे का? असे विचारले असता, मंत्री शिंदे म्हणाले की, हा धोरणात्मक निर्णय आहे. महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते व शरद पवार मिळून याबाबत निर्णय घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत.
राज्यात ईडीच्या कारवाया वाढल्या असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, ईडी एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. अन्यथा लोकांचा त्यावरील विश्वास उठेल. राजकीय द्वेषापोटी कोणी ईडीचा दुरूपयोग करत असेल तर ते चुकीचे आहे.
--------
औरंगजेबाचे प्रेम असण्याचे कारण नाही
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. शिवाय तेथे औरंगजेबाबद्दल कोणाला प्रेम असण्याचे कारण नाही. छत्रपती संभाजीराजे आपल्या राज्याची, देशाची अस्मिता आहे. त्यामुळे लोकांच्या या भावनेबरोबर शिवसेना होती आणि असेल, असा विश्वास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
-----------
राज्यपाल-सरकारमध्ये संघर्ष नाही
राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्यावरून जो प्रकार झाला त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले आहे. राज्यपाल आदरणीयच व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार व राज्यपाल यांच्यात कोणताही संघर्ष नाही, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.
---------
फोटो - १२एकनाथ शिंदे