अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत, तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवत आहेत. काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहेत, असे सांगतात; परंतु प्रत्यक्षात लोक गर्दी करीत असल्याचे दिसून आले आहे. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या दररोज कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, होणारे मृत्यू व पुरोहितांची सुरक्षितता आदी बाबींचा विचार करून दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पत्रकात म्हटले आहे. सदरचा विधी सव्वामहिन्यानंतरही करता येऊ शकतो. शास्त्र आणि सुरक्षितता यांची सांगड घालून विधी करावेत, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहितांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:18 AM