गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय दुर्दैवी-थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:10 AM2019-09-07T11:10:29+5:302019-09-07T11:11:13+5:30
सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशाचे व महाराष्ट्राच्ेो आराध्य दैवत आहे. लोकशाहीची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनीच रुजवली. गडकिल्ले हे सर्वांचे स्फुर्तीस्थान असून तेच गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी व चुकीचा आहे. या सरकारने या निर्णयामधून काय साधले आहे, हे कळत नाही. गड-किल्ले भाड्याने देऊन त्यामधून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. हे सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत दु:खदायक आहे.
खरे तर काम करण्यासाठी सरकारला खूप मोठा वाव होता परंतु त्यांनी जाणीवपूर्वक महत्त्वांच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील शेतकरी मोठा अडचणीत आहे. हजारो कंपन्या बंद पडत असून अनेक लोक बेरोजगार होत आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी आली आहे. याबाबत उपाययोजना शोधण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द््यांच्या आधारे राजकारण करू पाहत आहे. फक्त जाहिरातबाजी करायची व प्रसिद्धी मिळवायची असे या सरकारचे काम असून हे सरकार सर्व पातळीवर अत्यंत अपयशी ठरले आहे.
ऐतिहासिक गड किल्ल्यांवर हॉटेल निर्माण होऊन विविध समारंभामुळे तेथील पवित्रता धोक्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचेही प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.