अहमदनगर : उच्च वैद्यकीय विभाग वगळता उच्च तंत्र व इतर तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा घेण्याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
अहमदनगर शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.२९ मे) मंत्री तनपुरे पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. उच्च तंत्र शिक्षणच्या परीक्षेबाबत एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडून आज अहवाल येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्यातील उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा पूर्णपणे विचार केला जाईल. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. शासनाकडून पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तनपुरे यांनी यावेळी दिली.