शिर्डी : राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर या नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरकारची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नामांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार पटेल यांनी शनिवारी (दि.९) शिर्डीत येवून साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साईसंस्थानच्या वतीने पटेल यांचा सत्कार केला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पटेल म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती आहे. समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होवून या वादावर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे ही शिवसेनेची ब-याच वर्षापासूनची मागणी आहे. शिवसेनेचे नेते औरंगाबातला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.
भंडारा येथील रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुदैवी आहे. याबाबत आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी चर्चा केली आहे. ते घटनास्थळी भेट देणार आहेत. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घटना गांभिर्याने घेवून राज्यातील इतर रूग्णालयात अशा घटनांना पुनरावृत्ती होवू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही पटेल यांनी केले.