बोधेगाव : शेवगांव तालुक्यातील बोधेगाव हे मोठी बाजारपेठ असलेले तसेच राजकियदृष्ट्याही मराठवाड्याच्या सीमेवरील महत्वाचे गाव आहे. मात्र येथील शासकीय विश्रामगृहाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.याठिकाणी कामानिमित्त अनेक राजकीय लोक आणि प्रशासनातील अधिकारी यांची वर्दळ असते. अनेकांना येथे मुक्कामी थांबण्याची वेळ येते. परंतू काही खास मिटिंग आणि महत्वाची कामे करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहाच्या आश्रयाला अनेक व्ही.आय.पी. मंडळी येतात. शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहात पाणी नाही, सगळ्या इमारतीत धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. तसेच दरवाजे-खिडक्यांची अवस्था तुटून फुटून दयनीय झाली आहे. शेवगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेली वास्तूची अशी दुरावस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा का करत आहे? असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.संबंधित विश्रामगृहाची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी पाहणी करून दुरूस्तीचे प्रस्ताव सादर करण्याचा सुचना केल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याठिकाणीची स्वच्छता तात्काळ करण्यात येईल. - उमेश केकाण, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेवगाव.
बोधेगाव शासकीय विश्रामगृहाला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:46 PM