भिंगार: गुलालाची उधळण करीत, ढोल ताशाच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आठ दिवसाच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या श्री गणेशाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मानाच्या देशमुख गणपतीसह अन्य १२ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. आठ दिवस मनोभावे पूजा-अर्चा, देखावे व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मानाच्या देशमुख गणपतीची आरती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अनेक गणेश भक्त उपस्थित होते. आरती होताच मिरवणुकीस सुरवात झाली. देशमुख गणपतीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत छोट्या मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. ब्राम्हणगल्लीमधील देशमुख गणपती मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावर्षी बहुसंख्य मंडळांनी पाश्चात्य डीजे संस्कृतीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. मैत्री प्रतिष्ठान, शुक्लेश्वर तरुण मंडळ, शिवबा ग्रुप, आझाद तरुण मंडळ, सम्राट तरुण मंडळ, भैरवनाथ अस्तान तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळासह अन्य मंडळानी मिरवणुकीत सहभाग घेतला. ढोल-ताशा, डीजे व पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर अनेक गणेश भक्त ठेका धरत होती. मंगलमूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला चैन पडेना जिवाला. या घोषणांन परिसर दणाणून गेला होता. (वार्ताहर)मानाच्या देशमुख गणपतीची पूजा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.गणेश उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्या उपस्थित २ उपअधीक्षक ७ अधिकारी,११२ पोलीस कर्मचारी यांसह मोठा बंदोबस्त तैनात होता. शहराला छावणीचे स्वरूप आले होते. गवळीवाडा,सदर बाजार,दानेगल्ली मोमीन गल्ली, माळ गल्ली मार्गे प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या जलस्रोतांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी शुक्लेश्वर जवळील विहिरीत मूर्ती व निर्माल्य विसर्जित करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक उत्साहात सुरु होती.
भिंगारमध्ये बाप्पाला निरोप
By admin | Published: September 06, 2014 11:58 PM