अहमदनगर: नगर- मनमाड महामार्गावर सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्ताला एक तर पायवाट म्हणून तरी घोषित करा किंवा माणसांना जनावरे म्हणून तरी घोषित करा, अशा जहरी शब्दात या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत टीका करण्यात येत आहे.
अहमदनगर- मनमाड हा महामार्ग खड्डे आणि अपघातामुळे कायम चर्चेत असतो. कोरोना लाऑकडाऊनपासून या महामार्गावर छोटी-मोठी दुरूस्ती करण्यात आली,मात्र पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यत या रस्ताची दुरावस्था झाली आहे.
आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला आणखी एक पीडा लागली आहे ती म्हणजे रस्त्यांची. खचलेला रस्ता, जागोजागी खड्डे, साचलेला चिखल, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी अशी रस्त्याची दुरावस्था जागोजागी पहायला मिळत आहे.
या महामार्गाबाबत गत आठवड्यात रस्त्यांची चाळणी अशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. सलग चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ता आणखी खदाब झाला आहे. त्यामुळे नागरिकही सोशल मीडियावरून टीका करू लागले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी तर जहरी शब्दात रस्त्यावर टीका केली आहे. रस्त्यावरचा चिखल पाहूत ते म्हणाले, एक तर महामार्गाला पायवाट म्हणून घोषित करा अथवा माणसांना जनावरे तरी. कारण या रस्त्यावरून माणसे नव्हे तर जनावरेच चालू शकतात, इतकी भयाण अवस्था आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी डांबरी रस्ते तयार झाले आहेत. मात्र महामार्गाला पायवाटीचे स्वरुप आले आले.
या रस्त्यावर अनेकजण सोशलवरून प्रशासनाची खिल्ली उडवत असल्याचे पहायला मिळत आहे.