सोनई : पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत. देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. देशभरातून शनी शिंगणापूरला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना प्रसाद म्हणून झाड दिल्यास भाविक या झाडाचे रोपण व संगोपन करतील. या उपक्रमातून वृक्ष लागवडीचा संदेश देशभरात जाण्यासही मदत होईल. पर्यावरणाला धार्मिक जोड देण्याचा प्रयत्न केला असून राज्यभरातील देवस्थानमध्ये हा पहिलाच प्रयोग असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लिंबाचे आयुर्वेदिक महत्व असल्यामुळे देवस्थानच्या स्वमालकीच्या जागेत रोप वाटिका तयार करण्याचे आदेशही त्यांनी देवस्थानला दिले. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ.रावसाहेब बानकर, आदिनाथ शेटे, शालिनी राजू लांडे, भागवत बानकर, आप्पासाहेब शेटे, पोलीस पाटील सयाराम बानकर, सहाय्यक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दंरदले, अॅड. एल.डी.घावटे, वृक्षसंवर्धन विभागाचे सीताराम तुवर, भाविक उपस्थित होते.
शनैश्वर देवस्थानकडून भाविकांना प्रसादरूपी वृक्षभेट; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:39 PM