अहमदनगर : जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व विविध पर्यावरणस्नेही संघटनांच्या सहकार्याने तसेच जिल्हाध्यक्ष निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पक्षीगणना २०१९ सलग दहाव्यावर्षी जिल्हाभरात यशस्वीरीत्या संपन्न झाली.१४ तालुक्यांतील २१४ प्रौढ निरीक्षकांसह सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातील ५६८ ठिकाणी ही पक्षीगणना करून १५५ प्रजातींच्या १ लाख २३ हजार पक्षांची नोंद घेतली. पाथर्डी तालुक्यातून ६४ प्रौढ निरीक्षकांसह ६२१विद्यार्थ्यांनी १५९ ठिकाणी गणना करून जिल्ह्यात यावषीर्ही सर्वाधिक सहभाग नोंदवला. शेवगाव तालुक्यामध्ये पक्षांच्या प्रजातींमध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळुन आली. या वर्षी जिल्हाभरातील दुष्काळ सदृष्य परिस्थिती व सर्वञ आटलेले तलाव यांमुळे पक्षांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.दरवर्षी हजेरी लावणा-या परदेशी पक्षांच्या प्रमाणात तीन चतुर्थांशाने घट झाली असली तरी शेवगावच्या किनारी भागात माञ रोहित या आकर्षक हंसांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसुन आले. यावर्षी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींची संख्या दुप्पटीने वाढल्याने जिल्ह्यात पक्षांच्या आणखी नवीन १५ प्रजातींचा शोध घेण्यात निरीक्षकांना यश मिळाले.पाणभिंगरी, निळा कस्तुर, नाकेरबदक, वृक्षसर्पी, पाणचिरा, करवानक, राखी भारीट, वृक्षचरचरी, माळटिटवी अशा आगळ्यावेगळ्या दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांची छायाचिञांसह नोंद घेतली.शिवकुमार वाघुंबरे, सचिन चव्हाण, संदिप राठोड, अनमोल होन, भैरवनाथ वाकळे, डॉ.नरेंद्र पायघन, चंद्रकांत उदागे, नम्रता सातपुते, शैलजा नरवडे, सुधीर दरेकर, बाळासाहेब डोंगरे, राजेंद्र बोकंद, शशी ञिभुवन, विजय राऊत, फौजिया पठाण, महावीर रांका, सचिन धायगुडे, अंकुश झिंजे, वाल्मीक बडे, गितांजली कोल्हे, गोकुळ नेहे,आजीनाथ राऊत,ज्योती आधाट, परिमल बाबर, विकास सातपुते, सुभाष सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
दुष्काळामुळे पक्षांच्या संख्येत निम्म्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 6:28 PM