अकोले : तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांच्या पुढाकारातून तसेच जिल्हा बँक कर्मचारी, पतसंस्था व दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० ऑक्सिजन बेड्स असलेल्या कोविड केअर सेंटरचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपेरे, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर तसेच आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
शिक्षकांच्या दातृत्वातून उभारलेल्या या कोविड सेंटरचे समाजातून कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना नाचणठाण येथे उपोषणार्थी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचायचे होते. त्यामुळे ते काेविड सेंटरच्या उद्घाटनासाठी लवकरच पोहोचले. बीजमाता राहीबाई पोपेरे, निवृत्ती महाराज देशमुख यांची काही काळ वाट पाहण्यात आली. तोपर्यंत आमदार लहामटे यांनी कोविड सेंटरची पाहणी करून शिक्षकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. काही वेळ वाट पाहूनही पोपेरे व इंदोरीकर महाराज उद्घाटनासाठी पोहोचले नाहीत. मात्र, आमदार लहामटे यांना पुढील नियोजित भेटीसाठी जायचे असल्याने नियोजनात ऐनवेळी बदल करावा लागला. त्यामुळे लहामटे हस्ते फीत कापून या कोविड सेंटरचे लाेकार्पण करण्यात आले. त्यानंतर लहामटे पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर काही वेळाने पोपेरे व इंदोरीकर महाराज दाखल झाले. त्यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत इंदोरीकर महाराज यांनी इतरांनाही शिक्षकांच्या उपक्रमाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. पोपेरे व इंदोरीकर महाराज यांच्या हस्ते कोविड सेंटरमधील कळ दाबून रुग्णसेवेत हे कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, जि. प. सदस्य कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, डाॅ. अजित नवले, तहसीलदार मुकेश कांबळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे, नोडल अधिकारी डाॅ. श्याम शेटे, डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, दत्ता नवले, प्रदीप हासे, उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे, भाऊपाटील नवले, राजेंद्र सदगीर, सुनील धुमाळ, अण्णासाहेब आभाळे, बाबासाहेब दातखिळे आदी उपस्थित होते.