शिर्डी : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्यावर राज्य सरकारने आता संस्थान ऐवजी पाथरीच्या विकासाची जबाबदारी सोपवली आहे़ मुगळीकर यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली झाल्याने पाथरी आता त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणार आहे़ साईसंस्थानचे सीईओ पदावर मात्र अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.जन्मस्थानाच्या मुद्यावरून चर्चेत आलेली पाथरी परभणी जिल्ह्यात आहे़ मुख्यमंत्र्यांनी पाथरीचा साईजन्मस्थान म्हणून उल्लेख केल्याने मोठा वाद उफाळला होता़ शिर्डीत या विरोधात बेमुदत बंद पाळण्यात आला होता़ यावर सरकारने पाथरीला निधी देतांना जन्मस्थान असा उल्लेख करणार नाही, अशी भूमिका घेऊन वादावर पडदा टाकला होता़ नुकताच पाथरीसाठी १७८ कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी परभणीचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणीही केली. १४ फेब्रुवारी रोजी या संदर्भात मुंबईत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही होत आहे़ त्यात हा आराखडा सादर करण्यात येणार आहे़ तत्पूर्वीच संस्थानचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुगळीकर यांना परभणी जिल्हाधिकारी पदावर पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने आहे़ मुगळीकर यांनी मार्च २०१९ मध्ये रूबल अग्रवाल यांच्याकडून साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता़ त्यांच्याच काळात पाथरी जन्मस्थळाचा वाद उदभवला होता़ कोणत्याही वादापासून चार हात लांब राहण्याची त्यांची भूमिका होती़ शिर्डीमध्ये त्यांच्या कार्यकाळात ५८८ कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात आले.
साई संस्थानचे सीईओ मुगळीकर यांच्यावर आता पाथरीच्या विकासाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:52 PM