श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण व खून हे खंडणीसारखी प्रकरण नाही. त्यामागे वेगळे कारण असून, पोलीस दोन दिवसांत निश्चित आरोपींपर्यंत पोहोचतील, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
रविवारी हिरण यांचा मृतदेह एमआयडीसी शिवारात आढळून आला होता. या घटनेची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. ते रविवारी दिवसभर श्रीरामपुरात ठाण मांडून होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप यांच्या समवेत त्यांनी शासकीय विश्रामगृहावर थांबून कारवाई सुरू केली. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी मनोज पाटील यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पाटील म्हणाले, अपहरण घडल्यानंतर त्याच क्षणापासून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. मात्र अधिक आक्रमकतेने तपास हाती घेतला असता तर हिरण यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे संयमाने यंत्रणा राबविली गेली. तपासात कुठेही ढिलाई दाखविली नाही. हा गुन्हा केवळ खंडणीच्या मागणीतून घडलेला नाही. त्यामागे वेगळी कारणे आहेत. आम्हाला धागेदोरे हाती लागलेले आहेत. काही संशयितांना चिन्हित करण्यात आले आहे. दोन दिवसांमध्ये आरोपींपर्यंत पोलीस पोहोचतील, अशी अपेक्षा मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर हे जिल्ह्यातील एक सांस्कृतिक केंद्र आहे. या शहराला मोठा वारसा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या शहराच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्राधान्य दिले आहे. शहर पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती यापूर्वी त्यासाठी करण्यात आली होती, असे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. लोकशाही मार्गाने आपली प्रतिक्रिया नोंदवावी. मात्र काही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच आरोपींना काही सूट मिळेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी विनंती पाटील यांनी व्यापाऱ्यांनी केली.
यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, भाजप शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, नगरसेवक किरण लुणिया, सुनील वाणी, मर्चन्ट असोसिएशनचे विशाल फोफळे, लकी सेठी, मुक्तार शाह, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडधे, अक्षय वर्पे आदी उपस्थित होते.