श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे तपासाची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, उपअधीक्षक संदिप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.
या प्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पाच आरोपींना अटक केली आहे. संदिप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय २६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक २२ वर्षीय आरोपी या आरोपींना अटक करण्यात आली. अपहरण करण्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.
आरोपींकडून हिरण यांचा मोबाईल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हँन (एमएच १५, जीएल ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हँनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा
अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हँनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हँनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हँन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाईलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.