श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. तो रावणाची पूजा करतो व राम मंदिर उभारण्यात आल्याने तो नाराज झाला. त्याचा फटका बसून पराभव झाल्याचे सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.
माजी खासदार सदाशिव लोखंडे हे नगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी येथे खासदार होण्यापूर्वी ते कर्जतचे पंधरा वर्षे आमदार होते. तेथील आपल्या समर्थकांच्या भेटीगाठीसाठी ते गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पराभवामागील कारणांची विचारणा केली. त्यावर सदाशिव लोखंडे यांनी अजब उत्तर दिले.
ते म्हणाले, शिर्डी मतदारसंघांमध्ये आदिवासी समाज लक्षणीय संख्येने राहतो. तो रावणाला मानणारा समाज आहे. राम मंदिर बांधल्यामुळे तो दुखावला गेला. त्यातून माझ्या विरोधात मते गेली. शिर्डी लोकसभेत साखर कारखानदारांचे मोठे साम्राज्य आहे. एक साखर कारखानदार दुसऱ्या विरोधात राजकीय लढाई करतो. त्यांच्यातील लढाईचाही मला फटका बसला, असे सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.