श्रीगोंदा : गेल्या ३०-३५ वर्षांच्या सत्तेत काम करताना आ.पाचपुतेंना विकासाचे प्रश्न सोडविताना अपयश आले. जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता पाचपुतेंनी अपक्ष अथवा कोणत्याही पक्षाची उमेदवारी केली तरी जनता पाचपुतेंचा पराभव केल्याशिवाय सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीगोंदा कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.नागवडे पुढे म्हणाले की, पाचपुतेंनी राजकारणात शरद पवारांना पांडुरंग मानले. अडचण येण्याची चिन्हे दिसताच पक्ष सोडण्याचे संकेत दिले.पाचपुतेंना एकही संस्था नीट चालविता आली नाही. साईकृपाला कर्ज दिले नाही हे निमित्त आहे़ यामध्ये वेगळेच राजकारण आहे. आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन दौरा केला. आम्ही एकास एक उमेदवार देण्यावर ठाम आहोत. तुमच्यातील काही इच्छुक उमेदवार इतर पक्षाच्या संपर्कात आहेत असे विचारले असता, कोणी कुठेही गेले तरी आम्ही एकत्र येणार आहोत, असे नागवडे म्हणाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, सुभाष शिंदे, विलास वाबळे, गणपत जंगले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पाचपुतेंचा पराभव अटळ
By admin | Published: August 08, 2014 11:30 PM