अहमदनगर : नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे.शहरातील बुरुडगाव रोड परिसरात राहणारा रोहित राजेंद्र गुंदेचा (वय ३३) याला २३ आॅक्टोबर २०१७ रोजी एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने जॉब हवा आहे का, अशी विचारणा केली. रोहित याने संमती दर्शविताच सदर व्यक्तीने एका वेबसाईटचे नाव सांगून त्यावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी भरण्यास सांगितले. तसेच १०० रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरण्यासाठी याच वेबसाईटवर असलेले पेमेंट आॅप्शनमधून आॅनलाइनवर जाण्यास सांगितले़ पैसे भरण्याच्या आॅप्शनमध्ये फिर्यादीस आलेला ओटीपी भरण्यास सांगितले. त्यानंतर रोहित याला आलेला व्हेरिफिकेशन कोड त्या व्यक्तीने विचारून घेतला. त्यानंतर लगेच रोहित याच्या बँक खात्यातून सदर व्यक्तीने ६८ हजार ५०० रुपये काढून घेतले़ याबाबत रोहित याने २ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला, तेव्हा रोहित याला दिल्ली येथून हिमांशू अरोरा यानेच फोन केल्याचे समोर आले. सायबर पोलीस पथकाने दिल्ली येथे जाऊन अरोरा याला ताब्यात घेतले. निरीक्षक सुनील पवार यांच्यासह उपनिरीक्षक पी. डी. कोळी, कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड, भगवान कोडार, सम्राट गायकवाड, नेहा तावरे व सीमा भांबरे, पूजा भांगरे यांनी ही कारवाई केली.
दोन साथीदारांच्या मदतीने फसवणूक
अरोरा याने त्याचे दिल्ली येथील साथीदार दसविंदरसिंग व विपुल यांच्या मदतीने रोहित याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सीमकार्ड जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ या आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
आॅनलाइन फ्रॉडचे दिल्ली रॅकेट
नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बहुतांशी जणांची आॅनलाइन फसवणूक झालेली असून, अशा पद्धतीने फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार हे दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यांतील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खोट्या फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.