अध्यात्म/ राधेश्याम कुलकर्णी / मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात. सर्वात प्रथम ते आपल्या आई, वडिलांच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करतात. त्याप्रमाणे अनुकरण करतात. त्यानंतर शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे केवळ उपदेशाने संस्कार घडत नाहीत तर त्यांच्या समोर आदर्श असायला हवे आहेत. मनाला चांगल्या सवयी, संस्कार होण्यासाठी फार काही अवडंबर करण्याची आवश्यकता नसते. मात्र दुष्परिणाम करणा-या गोष्टींचा प्रयत्नपूर्वक त्याग करण्याचा मनाचा निग्रह व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आग्रह म्हणजे संस्कार. करिअरच्या स्पर्धेच्या काळात सहज संस्कार कसे घडवता येतील, या बाबत जागृत राहण्याची जबाबदारी पालक व शिक्षक यांच्यावर येते. कुटुंबात मुलांशी संवाद, आदर्श व्यक्तिंचे चरित्र गोष्टी त्यांना सांगणे, एकत्रित भोजन, नियमित संस्कारक्षम पाठांतर हसत खेळत करुन घेणे यामुळे सहज संस्कार होतात. त्यातून मनप्रसन्नतेची अनुभूती घेता येते. चांगल्या सवयी जर का मनाला लावल्या तर ते त्यापासून दूर जात नाहीत. मग त्या मनाची प्रसन्नता घालविण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी फरक पडत नाही. समर्थ रामदासांनी मनोबोध किंवा मनाचे श्लोकाव्दारे मनावर संस्कार कसे व्हावेत, याचा वस्तूपाठच सांगितला आहे.मना वासना दृष्टकामा नये रे मना सर्वथा पापबुध्दी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा, धावत्या युगात आई, वडिल, शिक्षक, सर्वांनाच स्वत:चे मन व्यवस्थापन सांभाळीत पिढी घडवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी आपल्या व मुलांच्या करिअरमधील थोडा दैनंदिन वेळ संस्कारासाठी काढावा लागेल. संत चरित्र, राष्ट्रपुरुषांचे चरित्र, आदर्श कथा मुलांना सांगव्या लागतील त्या सांगण्यासाठी आपल्याला वाचाव्या लागतील. एक उपक्रम देखील राबवता येऊ शकतो. सेवानिवृत्त, अनुभवी, वेळ उपलब्ध असलेल्या बंधू भगीनिंनी आपल्या परिसरातील लहानग्यांना एकत्रित करुन रोज किंवा साप्ताहिक एक तासाचा विनामूल्य संस्कार वर्ग सुरू केल्यास नातवंडांवर संस्कार करीत आपले आयुष्य हसरे करता येईल. आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचय हे खरं. प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. परंतु सर्वांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक मध्यम मार्ग समर्थांनी सांगितला आहे.
मनाची प्रसन्नता आणि संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:47 PM