यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना कृषीविषयक बाबींचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण ६० हजार ३९२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. त्यातून आज अखेर ६ हजार ४२० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये कापूस बियाण्यासाठी ५ लाख २५ हजार ४७६ पाकिटे (प्रत्येकी ४५० ग्रॅम) एवढा कोटा मंजूर झाला आहे. त्याची प्रत्यक्ष विक्री शेतकऱ्यांना १ जूननंतर करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एकूण २ लाख ५५ हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून, त्यातून २ लाख ११ हजार मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. आजअखेर १ लाख २६ हजार टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी ३१ हजार २८५ टन खताची विक्री झाली असून, ९४ हजार ८०० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.
जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकऱ्यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी. खत वितरकांनी पॉस मशीनच्या साह्याने खते वितरित करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
---------------
शेतकऱ्यांकडून युरियाची मोठी मागणी
शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुषंगाने १ लाख ५ हजार ८६९ मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून, त्यातून ८१ हजार ९१० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून ८ हजार ९४९ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.
------------
तक्रार निवारण कक्ष, भरारी पथके
बियाणे आणि खतांच्या तक्रार निवारणासाठी निवारण कक्ष व भरारी पथकांची स्थापना तालुका तसेच जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी तक्रार करता येणार आहे.