पाथर्डी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी अजंठा चौकात नुकतेच चालू केलेल्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली आहे. प्रशासनाकडून याबाबत कुठलेही नियोजन केले गेले नाही. फिजिकल डिस्टन्सचा अभाव आणि अनियोजित वितरण व्यवस्थेमुळे परिसरात अधिकच कोविड संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. येथे योग्य नियोजन करावे, यासाठी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले.
६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांसह सर्वच उर्वरित पात्र लोकांना क्रमबद्धरित्या लसीकरण करून पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठी राहिलेले डोस नियोजनबद्ध रितीने उपलब्ध व्हावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर शाहनवाज शेख, सचिव प्रा. जालिंदर काटे, किशोर डांगे, रवींद्र पालवे, गणेश दिनकर, आदिनाथ देवढे, अनिल साबळे, जुनेद पठाण, दत्ता पाठक, जब्बार आतार, शहजादे शेख आदी उपस्थित होते.