अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. हाॅस्पिटलमधील सत्यता पाहण्याकरिता तसेच रुग्णांची देखभाल व्यवस्थित होते की नाही याची शहानिशा व्हावी, यासाठी खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत? की, सध्याच्या परिस्थितीत काही हॉस्पिटलमध्ये सेवाभावी काम दिसून येते आहे, तर काही हॉस्पिटलमध्ये फक्त व्यावसायिकीकरण असल्याचे दिसून येत आहे. कोविड रुग्णाला दाखल केल्यानंतर हॉस्पिटलकडून कोणतीही कल्पना दिली जात नाही. फक्त उपचार चालू आहेत, रुग्ण गंभीर आहेत, एवढेच सांगितले जाते. आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले व त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटलच्या आवारामध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखविल्यास रुग्णांची परिस्थिती समजू शकेल. यामुळे नातेवाईकांना दिलासा मिळेल. तसेच रुग्णालयात किती बेड आहेत? कोणत्या बेडवर कोणता रुग्ण उपचार घेत आहे, याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.