कलिंगड, खरबूजची आवक वाढली
अहमदनगर : उन्हाळा सुरू झाल्याने कलिंगडाची आवक वाढली आहे, तसेच खरबूजही विक्रीसाठी आले सून, औरंगाबाद रोड, पाइपलाइन रोड, मनमाड रोड आदी रस्त्यांवर कलिंगड व खरबूज विक्रीसाठी आले असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
....
यशोदानगर येथील भाजी बाजारात अंधार
अहमदनगर : येथील पाइपलाइन रस्त्यावरील यशोदानगर येथे दररोज भाजीपाल्याचा बाजार भरतो. शनिवारी व रविवारी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते; परंतु या भागात दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे या भागात सर्वत्र अंधार असून, महिलांची गैरसोय होत आहे. या भागात दिवाबत्तीची सोय करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
......
माठाची मागणी वाढली
अहमदनगर : उन्हाचा कडाका वाढला आहे. थंडगार पाण्यासाठी काळे व रंगीत माठ बाजारात दाखल झाले आहेत. औरंगाबाद, मनमाड, पुणे, सोलापूर महामार्गावर परजिल्ह्यातील माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी माठाला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
....
शटर बंद करून दुकाने सुरू
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे; परंतु शटर बंद करून काही दुकाने सुरूच असून, मर्यादित ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने सुरू आहेत.
.....
आइस्क्रीम, कुल्फीला कोरोनाचा फटका
अहमदनगर : उन्हाळ्यात थंडपेय, आइस्क्रीम, कुल्फीला चांगली मागणी असते. यातून अनेकांना रोजगार मिळत होता; परंतु चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे आइस्क्रीम, कुल्फीकडे पाठ फिरविली आहे.