कोपरगाव : गोदावरी कालव्याच्या रब्बी हंगामातील शिल्लक पाण्यातून आवर्तन सोडावे तसेच उन्हाळ हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्यात या मागणीचे पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना लाभधारक शेतकऱ्यांनी निवेदन देत मागणी केली आहे.
गोदावरी डाव्या कालव्यातून रब्बी पिकांसाठी उन्हाळ्यात तीन आवर्तनाच्या प्रास्तावित साठ्यास धक्का न लावता १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांना पाणी मिळावे. यासाठी पाटबंधारे विभागास मागील महिन्यात १८ जानेवारी ला निवेदन दिले होते. परंतु, त्यासंदर्भात अद्यापपर्यंत पाटबंधारे विभागाकडून कुठलेही उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यावर योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु, ती झालेली दिसत नाही. त्यासाठी स्मरण म्हणून पुन्हा निवेदन देण्यात येत आहे. तसेच प्रस्तावित उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात जेणे करून उन्हाळी हंगामासाठी शेतकरी आपले बारमाही पिकाचे नियोजन करू शकतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेतकरी तुषार विध्वंस, प्रवीण शिंदे यांच्या सह्या आहेत.